एखादी गोष्ट आपल्या मनात कित्येक दिवस घर करुन राहते. आपण कितीही कामाच्या ओघात तिला विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट रोज रात्री मनाच्या कोपऱ्यात पहारा देत असते. असचं काहीतरी झालं होत माझं कळसुबाईच्या बाबतीत. तब्बल वर्षभर कळसुबाईचा ट्रेक मनात घर करुन होता. काही ना काही कारणांमुळे तो नेमका राहत होता. त्याच्याशिवाय अनेक ट्रेक झाले वर्षभरात पण तो मात्र काही जमेनाच. हिवाळ्यात एकदा दोनदा संधी आली सुद्धा होती पण मला पावसाळ्यात कळसुबाईला जायचे होते. त्याचे कारण म्हणजे मला अनेकजण म्हटले होते, ''तुझ्याकडून पावसाळ्यात कळसुबाई होणे शक्यच नाही.'' बस! तेव्हाच ठरवलं होतं कळसुबाई करेन तर भर पावसाळ्यातच.

शनिवारी (4 ऑगस्ट) मात्र सारे योग जुळून आले आणि मी कळसुबाईकडे निघाले. मागील काही ट्रेक्सपासून मी एक गोष्ट जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न करते ती म्हणजे, मित्र मैत्रिणींना सहसा सोबत न घेऊन जाता अनोळखी लोकांसोबत जायचं. सांधण व्हॅलीच्या वेळेसही असंच केल आणि आज सांधण व्हॅलीने मला एक जिवलग मित्र दिला. या वेळीही तसंच केलं. कोणालाही सोबत घेतलं नाही आणि एकटंच जायचं ठरवलं. कोणत्याही मोठ्या ट्रेकला सगळ्या अनोळखी लोकांसोबत जाणं वाटतं तेवढं सोपं अजिबात नसतं. पण आयुष्यात नवीन दृष्टीकोन मिळण्यासाठी हे करण्याचं धाडस मी दरवेळी मोठ्या हिंमतीनं करते.
शनिवारी रात्री गाडीत पाय ठेवला आणि देवकुंडच्या वेळेस ओळख झालेला मित्र बसलेला दिसला, पूर्वी एकटं जाण्याचं धाडस करुनही बावरलेल्या माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला. पण तो काही फार काळ टिकला नाही. कारण तन्मय शेजारी बसल्यावर मला कळलं की तो हरिहर गडावर जाणार आहे आणि मी पुन्हा लोकांनी भरलेल्या गाडीत एकटी पडले.
भल्या पहाटे 3.30 वाजता आम्ही जहागीरदारवाडी गावात पोहोचलो. हे गाव कळसुबाईच्या पायथ्याला आहे. गावातील जवळजवळ सगळ्यांचा उदर्निवाह शेतीवरच. चारही बाजूंनी भल्या मोठ्या डोंगरांनी वेढलेल्या या टुमदार गावावर पावसाळ्यामुळे संबंध हिरवा शालू पसरला होता. प्रचंड आवाज करत कोसळणारा पाऊस आणि कुडकुडवणाऱ्या थंडीत आम्ही थोडा आराम केला. पहाटे साडेपाचला उठून आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो. आजूबाजूला अजूनही काळोखच होता. सारी आवराआवर करुन साडेसहाच्या सुमारास आम्ही कळसुबाईच्या दिशेने निघालो. हळूहळू पूर्वेकडून सूर्य दर्शन देऊ लागला आणि आजूबाजूची भात शेती खुलून दिसू लागली. सूर्याकिरणांमुळे शेतातील पिकांना सोन्याचा भास होत होता. पहिल्या पाच मिनिटातच गुडघ्याभर पाण्यातून बंधारा पार करावा लागला आणि ट्रेकला सुरुवात झाल्याचा फिल आला.


ज्या बाजूला बघावे तिकडे फक्त दूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर आणि त्यांतून प्रचंड जोरात वाहणारे धबधबे दिसत होते. निर्सगाच्या या सौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही मजल दरमजल करत वर चढत होतो. पावसामुळे वाट अत्यंत निसरडी झाल्याने फार काळजीपूर्वक चालायला लागत होते. ऊन पावसाचा खेळ सतत सुरुच असल्याने फोटोग्राफर लोकांना चांगलीच पर्वणी होती. कळसुबाईवर जिथे चढण अतिशय अवघड होते तिथे लोखंडी शिड्या लावण्यात आल्या आहेत. अशा चार शिड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. त्यावरुन अत्यंत काळजीपूर्वक चढावे लागते.
पुढे जसेजसे आम्ही वर चढू लागलो तसे आजूबाजूचे सारे डोंगर धुक्यात हरवून गेले आणि जोरदार पाऊस सुरु झाला. शेवटची शिडी चढून आम्ही वर गेल्यावर ढगात पाऊल ठेवल्याचा भास मला झाला. त्यानंतरही सुमारे 20 ते 25 मिनिटं चालल्यावर शेवटी आम्ही कळसुबाई शिखरावर पोहोचलो. वर वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, मी वाऱ्याबरोबर पुढे पुढे जात होते. शिखरावरील भगव्यासमोर दोन क्षण डोळे मिटून उभी राहिले आणि सह्याद्रीच्या कुशीत माझा जन्म झाला या अभिमानाने माझा ऊर भरुन आला.

प्रचंड वेगाने वाहणारं वारं आणि असह्य थंडी यामुळे वर थांबणं शक्यच नव्हत आणि म्हणून आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आता उतरताना जास्त कसरत करावी लागणार होती. वाट निसरडी असल्यामुळे अत्यंत सावकाश उतरावे लागत होते. अनेक जण निसरड्या वाटेवरुन पाय घसरुन पडले, मीही त्यातलीच एक. काल अनोळखी असलेली माणसं आता माझे मित्र मैत्रिणी होते. गप्पा मारत मारत आम्ही खाली येऊ लागलो. सुमारे एक वाजता आम्ही पायथ्याला आलो. मागे वळून आपण कोठे गेलो होते हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न मी केला मात्र धुक्यामुळे शेवटचे टोक काही दिसलेच नाही. काही काळ मी माझ्या समोर असलेल्या महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला निरखून पाहिलं. मनाच्या एका कोपऱ्यात एव्हरेस्ट सर करण्याच्या स्वप्नाची पाल चुकचुकली आणि मी माघारी फिरुन गावाकडे जाण्यास निघाले.
from News Story Feeds https://ift.tt/2McF0XE
No comments:
Post a Comment